शिवसेनेचे आमदार आपल्या वक्तव्यावर ठाम; तुरुंगात जाण्यासही तयार

Pratap Sarnaik - Kangana Ranaut

ठाणे : ‘भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय महिला आयोगाशी संगनमत करून माझ्या अटकेचा कट रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी तयार आहे.’ असे शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ठणकावत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) केलेल्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. यावरून प्रताप सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. कंगनाला संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले होते. त्यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी सरनाईक यांच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी तसं पत्रही लिहिलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या या भूमिकेवरून सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या या भूमिकेमागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘महिला आयोगाला हाताशी धरून भाजपनं मला अटक करण्याचा खेळ रचला आहे. पण मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कितीही वेळा तुरुंगात जायला मी तयार आहे. ’ असं त्यांनी म्हटलंय. ‘मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसानं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.’ असंही ट्विट सरनाईक यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER