मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान, शिवसैनिकांचा भाजप पदाधिकाऱ्याला साडी नेसवण्याचा प्रयत्न

bjp-party-worker-was-beaten

पंढरपूर : वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं केलेल्या आंदोलनानंतर आता पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी कटेकर यांना गाठलं आणि त्यांना काळं फासलं. तसंच त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना जाब विचारत शिविगाळही केली. दरम्यान, शिरीष कटेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पंढरपूर शहर बंद करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER