मुख्यमंत्री माझे राजकीय गुरू असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार- पंकजा मुंडे

Devendra Fadnavis

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरू असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धडकली आहे. या सभेत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असंही त्या म्हणाल्या.

”अनेक वेळी मुलाखतीदरम्यान तुमचा गुरू कोण असं मला विचारलं जातं. अशा वेळी साहजिकपणे माझे वडील माझे गुरू असल्याचं मी सांगते. पण आज ते नाही आहेत. त्यांच्या पश्चात जर कुणी असेल तर मी सांगते देवेंद्र फडणवीस माझे गुरू आहेत. द्रोणाचार्याला अर्जुन हा त्याचा प्रिय शिष्य होता. त्याच्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरूसाठी अंगठा कापून देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे.

ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडेंना उत्तर देण्यासाठी आमचे सुरेश धस पुरेसे आहेत – मुख्यमंत्री

पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही. ” अशा शब्दात पंकजा यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मत मांडले . तसेच बीडची माणसं गरीब असली तरी त्यांचे मन मोठे आहे. लोकनेते मुंडेसाहेबांवर त्यांनी अतोनात प्रेम केले. त्यामुळेच भाजपला भरभरून यश मिळाले आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. मुंडेसाहेबांच्या पश्चात मी रडणार नाही, लढणार अशी शपथ घेतली होती. त्या दृष्टीने मी जनतेच्या भल्यासाठी काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.