मुंबईत शिवसेनेची गोची; विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपाकडून शिवसेनेतून आलेल्या नेत्याची निवड

bjp-opposition-leader in Mumbai Municipal Corporation

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनेनंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हेच चित्र बघायला मिळाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आपला महापौर बसवण्याचा निर्धार केलेल्या भाजपाने महापालिकेत नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे हे आता मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहेत.

मनोज कोटक यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर पालिकेमध्ये भाजपाला आक्रमक नेतृत्व मिळालं नव्हतं. त्यातच शिवसेनेच्या साथीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यामुळे भाजपा विरोधी बाकावर जात ‘पहारेकऱ्यां’च्या भूमिकेत शिरली. त्यानंतर मुलुंडचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रभाकर शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बीएमसीमध्ये प्रभाकर शिंदेंची तोफ सत्ताधारी शिवसेनेविरोधात धडाडताना पाहायला मिळणार आहे. उज्ज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांची महापालिकेत उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विनोद मिश्रा यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. तर सुनील यादव यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.

महाआघाडी असतानाही शिवसेनेचा अपेक्षाभंग; मीरा भाइंदरमध्ये भाजपाचा महापौर