सिंधुदुर्ग ZP अध्यक्ष निवडणूक : परिस्थिती हाताळण्यासाठी राणे पितापुत्र तळ ठोकून; शिवसेनेवर सदस्य फोडाफोडीचा आरोप

Narayan-Rane-Satish-Sawant

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (Sindhudurg ZP) अध्यक्ष आणि सभापती पदासाठी आज होणाऱ्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या फोडाफोडीवरून वादंग पेटले आहे. खुद्द भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) दिल्लीतील संसदेचं अधिवेशन सोडून सिंधुदुर्गात तळ ठोकून आहेत. भाजपकडे (BJP) पुरेसे संख्याबळ असले तरी काही सदस्य शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे.

मात्र आता ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी नारायण राणे आणि नितेश राणे हे सिंधुदुर्गात तळ ठोकून आहेत. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांच्यावर सदस्य फोडीवरून गंभीर आरोप केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. यासंदर्भात बँकेचे कर्ज घेतलेल्या काही जिल्हा परिषद सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून आपल्यावर जप्ती येऊ नये यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना येऊन भेटा, अशी धमकी देत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

भाजपच्या सदस्यांना फोन करून तुमचे कर्ज आम्ही जप्त करणार नाही, तुम्ही आम्हाला येऊन भेटा, तुम्हाला प्रत्येकी पंचवीस लाख देतो, असं सतीश सावंत फोन करून सांगत असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला. जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझेबरोबर जेलमध्ये पाठवण्याचा इशाराही राणेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER