चीन मागे हटला! देप्सांगचे काय? भाजपा खासदाराचा मोदी सरकारला प्रश्न

Subramanian Swamy

दिल्ली :भारत-चीन सीमेवरील तणाव हळूहळू निवळताना दिसतो आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात आमने-सामने आलेले भारतीय व चिनी सैन्य माघारी गेले आहे. पँगाँगमध्ये चीनने पूर्णपणे सैन्य माघारी घेतले आहे, असा दावा सरकार करते आहे. मात्र, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी पँगाँग सरोवर परिसरातील सैन्य माघारीचा हवाला देत देप्सांग परिसरातील उभारण्यात आलेल्या चिनी छावणीबद्दल मोदी सरकारला (PM Modi government) प्रश्न विचारला आहे. गलवानच्या खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चिनी लष्कराने (पीएलए) पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने एकदा चीनचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर भारत-चीन सीमेवर काही काळ युद्धसदृश  स्थिती निर्माण झाली होती.

भारत आणि चीन यांच्या लष्करी व राजकीय पातळीवर चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात चर्चेला यश आले. दोन्ही देशांनी पँगाँग सरोवर परिसरातील लष्कर मागे घेण्यावर सहमती झाली. पँगाँगमधील लष्कर चीनने मागे घेतले आहे. या सगळ्या घटनांनंतर स्वामी यांनी ट्विट करून मोदी सरकारला प्रश्न विचारला- चीन व भारताने पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे. म्हणजेच जूनमध्ये भारतीय लष्कराने एलएसी पार केले होते. ते ठिकाण आपण सोडले आहे; पण देप्सांगचे  काय, जिथे चीनच्या लष्कराने छावण्या उभारल्या आहेत? शांतता.

आज पुन्हा चर्चा…
सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये आज, शनिवारी इतर भागातील माघारीबाबत वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेची पुढची फेरी होणार आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरून सैन्य आणि शस्त्रास्त्रांसह अन्य सामग्रीही माघारी घेतल्याची उपग्रह छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER