भाजपचे खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, राजकीय चर्चेला उधाण

Sharad Pawar - Sanjay Patil

सांगली : सहकारातील संस्था कायम राखण्यासाठी रणनीती आखली जात आहे. यातूनच भाजपचे (BJP) खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांची भाजपच्या तंबूपेक्षा राष्ट्रवादीच्या गोटात उपस्थिती मोठ्याप्रमाणात वाढली आहे. आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समिती या आर्थिक केंद्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. मात्र संजय पाटील यांची राष्ट्रवादीसोबत (NCP) वाढत असलेली जवळीक भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्यांच्या वाढत्या संपर्कामुळे राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे.

जिल्हा परिषद, काही पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका यांच्यावर सध्या भाजपची सत्ता आहे. एक खासदार, सांगली-मिरजेचे विधानसभेचे आमदार, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे विधान परिषदेचे सदस्य एवढी सत्तास्थाने सद्य:स्थितीला भाजपच्या तंबूत असताना आर्थिक केंद्रे असलेल्या सत्तास्थाने आपल्या हातात घेण्यासाठी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये कोणत्याच हालचाली दिसून येत नाही हे विशेष.

सांगली बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ दिल्यापासून जेजीपी प्रयोगाचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. जेजीपी याचा अर्थ जिल्हा पातळीवर जयंत जनता पार्टी असाच घेतला जातो. काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी विरोधकांना सहकार्य करीत आपल्या सोबत घेण्याची किमया राष्ट्रवादीने घेतली. प्रसंगी एके काळी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महापालिकेत भाजपला सोबत घेउन महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला गेला. मात्र त्या वेळी याला सडेतोड आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेसकडे डॉ. पतंगराव कदम, मदनपाटील यांच्यासारखे बिनीचे शिलेदार होते. या वेळी त्यांची उणीव भासणार तर आहेच, पण काँग्रेसचे नेतृत्व करणारे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे जयंत पाटील यांना आव्हान देऊ शकतील असे वाटत नाही आणि नेमक्या याच स्थितीचा लाभ राष्ट्रवादी घेण्याच्या तयारीत आहे. आव्हान देणाऱ्यांना योग्य तो इशारा देण्यासाठीच सध्या राष्ट्रवादीची भरती सुरू असून मुख्य मोहरे भाजपमध्ये असले तरी पक्षीय जोडे उंबऱ्याबाहेर ठेवून जिल्हय़ाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे कारण पुढे करून पुन्हा एकदा जेजीपीचा सोयीचा नाटय़प्रयोग पाहण्यास मिळाला तर नवल वाटणार नाही.

एकीकडे करोना संकटाशी अख्खा जिल्हा लढत असतानाच गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि शेती धंदा मोडून गेला आहे. शासनाला जाब विचारण्याची विरोधक या नात्याने भाजपवर जबाबदारी असतानाही जिल्हय़ातील भाजपचे खासदार संजयकाका पाटील मात्र तासगाव, यशवंत साखर कारखाने सुरू करण्यात आडकाठी येणार नाही यावरच लक्ष केंद्रित करून आहेत. खासदार भाजपचे असले तरी त्यांची ऊठबस मात्र राष्ट्रवादी नेत्यासोबत जास्त आहे. यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खंबीर विरोधकाची उणीव भाजपलाही भासत आहे.

दरम्यान, खासदारांनी पुढाकार घेऊन तासगाव येथे कोव्हिड सेंटर सुरू केले. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाकरिता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्याची औपचारिकताही पाळली नाही. गेल्या आठवडय़ामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा सांगली दौरा झाला. या वेळी पक्षाचे खासदारम्हणून ते उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र ते यावेळी अलिप्त राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER