भाजप खासदार नाना पटोले स्वपक्षीय नाराज नेत्यांची मोट बांधणार, पुण्यात संमेलन

नागपूर : येत्या 15 तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती भाजप खासदार नाना पटोले एका वृत्त वाहिनीस सांगितली.

नाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. 10 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिले होते. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असे म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.