भाजप खासदार डॉ. हिना गावित लवकरच विवाहबंधनात

Dr.Heena Gavit

नंदुरबार : भाजप खासदार डॉ. हिना गावित लवकरच विवाहबंधनात अडकणार असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. एमडी असलेले डॉ.  तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. डॉ.  वळवी हे मुंबईत डॉक्टर आहेत. व्यवसायासाठी  ते मुंबईत राहात असले तरी नंदूरबार जिल्ह्यातील हातधुई हे त्यांचे मूळ गाव आहे. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. डॉ. हिना ह्या माजी मंत्री विजय गावित यांच्या  कन्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

एकेकाळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नंदूरबारचे राजकीय समीकरण बदलले होते. डॉ.  हिना गावित यांचा जन्म २६ जून १९८७ रोजी झाला. त्यांचेही शिक्षण एमबीबीएस, एमडी असे झाले आहे. हिना गावित यांनी २०१४  मध्ये पहिल्यांदा नंदूरबारमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. माणिकराव गावित हे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले होते.