पवारसाहेब जाणते राजे! मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा : भाजपची मागणी

Prasad Lad-Sharad Pawar Maharashtra Today

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावं बाहेर येत आहेत किंवा येतील, त्यातून मुंबई पोलिसांची होणारी नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणते राजे आहेत, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन उलगडे होत आहेत. स्कॉर्पिओ किंवा इनोव्हा कार असो किंवा आणखी पोलीस अधिकाऱ्यांची नावं असो. यामध्ये मुंबई पोलिसांची नाचक्की केली गेली, त्याला कारण कोण आहे? त्याला पाठीशी घालणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मी वारंवार विधान परिषदेत करत होतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राचे जाणते राजे मानले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पाठीशी घालत असेल तर ही खेदजनक गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER