भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत आणखी वाढ

Prashant Bamb

औरंगाबाद : भाजप (BJP) आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील 15 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात सहा जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) या प्रकरणी निर्णय दिला. गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील अपहार प्रकरणात प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल बंब यांच्या सहा सहकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील डी आर काळे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना मनी लॉन्ड्रिंग आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याची माहिती दिली. फिर्यादी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट रिपोर्ट, पोटनियम, खोटे अधिकार पत्र, मुखत्यार पत्र बाबत सविस्तर विवेचन करुन या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सहा जणांचे अर्ज फेटाळून लावल्याने आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे या गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. बंब हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात कारखान्यात निधीची अफरातफर झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करुन सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल केला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER