भाजपा आमदार सभागृहात घालून आले ‘मी पण सावरकर’ लिहिलेल्या भगव्या टोप्या

bjp-mla-orange-caps-written-me-pan-savarkar

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज ५४ वी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला. तसंच हा ठराव सभागृहात मांडण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली.

यावेळी विधानभवन परिसरात सावरकरांची प्रतिमा मांडून भाजपाच्या नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं. यानंतर सभागृहात भाजपा नेते ‘मी पण सावरकर’ असं लिहिलेल्या टोप्या घालून कामकाजात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे.

शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरून शिवसेना-काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत. दरम्यान सावरकरांच्या गौरवपर प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. राज्य, देश उभारणीत ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं.