भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; पत्राद्वारे डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती बेडची मागणी

Dr. Harshvardhan - Kesar Singh

नवी दिल्ली :- देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत चालली आहे. तसेच उत्तरप्रदेशात सध्या कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिला बेड किंवा इतर सुविधा मिळणे कठीण झाले आहे. अशातच उत्तरप्रदेशच्या एका आमदाराचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांचे मृत्यूपूर्वीचे पत्र आता सगळीकडे व्हायरल होत आहे.

उत्तरप्रदेशच्या बरेली येथील नवाबगंजचे आमदार केसर सिंग (Kesar Singh) यांना १८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते श्रीराममूर्ती स्मारक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारादरम्यान अधिक तपासण्या आणि प्लाझ्मा थेरपीचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला होता. त्यासाठी केसर सिंग यांना दिल्लीला उपचारासाठी जायचे होते. केसर सिंग यांनी १८ एप्रिल रोजीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये सिंग यांनी दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात एका बेडची मागणी केली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आयसीयू बेड मिळवण्यासाठी जवळपास २४ तास वाट पाहावी लागली. दरम्यान, केसर सिंग यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाने हालचाली केल्या आणि त्यांना नोएडातील एका रुग्णालयात हलवण्यात आले. पण बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या पत्रावरून सोशल मीडियावर (Social Media) उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकारवरही नेटकऱ्यांचा संताप व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button