चंद्रकांतदादांना गृहनगरातच मोठा धक्का, मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP - Congress

कोल्हापूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना त्यांच्याच गृहनगरात म्हणजेच कोल्हापूरमध्येच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या मोठ्या नेत्याने काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा (Congress) दुपट्टा गळ्यात घातला. गोपाळराव पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात भाजपला सोडचिठ्ठी देत ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली होती.

कोल्हापूरमध्ये भाजपची गळती सुरुच असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते गेल्या दिवसांपासून नाराज होते.

चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही गोपाळराव समर्थकांकडून होत आहे. तसेच भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी अखेर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER