भाजप नेत्यांच्या “गोली मारो सालोंको” यासारख्या वक्तव्यामुळे दिल्लीत आमचा पराभव : अमित शहा

नवी दिल्ली :- दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान भाजप नेत्यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे होते. “गोली मारो सालोंको” आणि “भारत-पाक सामना” यासारखे वक्तव्य या नेत्यांनी करायला नको होते. याचाच परिणाम दिल्लीत भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले आहे.

शहा म्हणाले, भाजप केवळ विजय किंवा पराभवासाठी निवडणूक लढवत नाही तर आपल्या विचारांच्या प्रसारासाठी निवडणूक लढवत असते. गोली मारो सालोंको आणि भारत-पाक सामना यासारखे वक्तव्य आमच्या नेत्यांनी करायला नको होते.

त्यांनी यापासून आपल्याला दूर ठेवायचे होते, असेही गृहमंत्री म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. निवडणुकीच्या काळात पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम निवडणुकीवर झाल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

ही बातमी पण वाचा : तुम्हाला शिवाजी महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?; भाजपाचा सेनेला प्रश्न

दिल्लीतील निडणुकांबाबत त्यांचे आकलन चूक असू शकते. मात्र येथील नागरिकांनी सीएए आणि एनआरसीच्या विरोधात नक्कीच मत दिले नसल्याचे ते म्हणाले.

सीएएबाबत कुणाला चर्चा करायची असेल तर ते यासाठी आपल्या कार्यालयात चर्चा करण्यास तयार आहे. आम्हाला तीन दिवसांचा वेळ द्यावा, असेही ते म्हणाले. धर्माच्या नावावर विभाजन करण्याचा ठपकाही त्यांनी काँग्रेसवर ठेवला.