भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा लक्षात आला : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संचारबंदीच्या काळासाठी राज्य सरकारने दिलेल्या पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा समोर आला, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचे बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता आणि आता त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. “राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसून ताबूत रिकामे असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज देत आहे.

हे थोड्या दिवसांसाठी आहे. आपण कोरोना साखळी तोडू, अशी अपेक्षा आहे. तरीही सरकार शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करत आहेत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो. भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा लक्षात आलेला आहे. कोरोना आल्यापासून मी मागणी करतोय की जगातल्या प्रत्येक देशाने त्यांच्या तिजोरीतून अब्जावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहेत. मोदी सरकारने पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात तटपुंजी मदत केली. कामगार जे काम करत आहेत आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना मदत केली पाहिजे, ही मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे होती.” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

केंद्रावर टीकास्त्र
कुंभमेळ्यात झालेली गर्दी व केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली, यामुळे कोरोना आणखी वाढणार आहे. कालची देशातील बाधितांची आकडेवारी गेल्या वर्षीच्या उच्चांकाच्या जास्त आहे. कुंभमेळ्यामध्ये जे घडले ते निषेधार्ह आहे, त्याला केंद्र पूर्णपणे जबाबदार आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button