पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल ; ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात!

Pankaja Munde

मुंबई : सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मात्र, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणं महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भादंवि 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजुरे, आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ अपलोड करून सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाची सूचना केली होती.

मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करून पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी पंकजांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या तसेच, येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली. मी घर बदलणार नाही, जिथे आहे तिथेच राहणार आहे. आता मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाचे काम देशाच्या पातळीवर करणार आहे, असं सांगत पंकजा यांनी पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER