पवारांच्या मतांशी सहमत असणारे ‘भाजपा’वासी राष्ट्रवादीत परतणार – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal-Sharad Pawar

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या अनेक नेते शरद पवारांच्या मतांशी सहमत आहे. भाजपामधील वातावरणाशी त्यांना पटणे शक्य नाही. त्यामुळे ते निश्‍चितपणे राष्ट्रवादीत परतणार, असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. नवी मुंबई महापालिकेत आमच्या प्रयत्नांना यश येईल, महाविकास आघाडीचीच सत्ता नवी मुंबई महापालिकेत येईल, असा दावाही भुजबळांनी केला.

भाजपातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. मात्र भाजपाला खिंडार पडेल की नाही, हे सध्या मी सांगू शकत नाही, मात्र भाजपाची सूज कमी होत आहे. भाजपातील नेते अस्वस्थ झाले आहे. अनेक सरकार येऊन गेली, मात्र हे इतके अस्वस्थ का होतात? ही अस्वस्थता लोकांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरत असल्याची टीका करत सत्तेचा ताम्रपट घेऊन आला आहात का? असा बोचरा सवालही भुजबळांनी भाजपा नेत्यांना केला.

ही बातमी पण वाचा : विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक वाढल्याने जिल्ह्यातील साठवणूक क्षमता वाढवावे – छगन भुजबळ

महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचा दावा भाजपाचे नेते वारंवार करत असल्याचा धागा पकडून भुजबळ यांनी भाजपाच्या माजी मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. सरकार नसल्यामुळे भाजपा नेत्यांना झोप लागत नसावी. सरकारला काम करु द्या, मग लोकच ठरवतील, आमचं काही चुकलं तर बाहेर जावं लागेल, मात्र त्यांची अस्वस्थता पहावत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

दरम्यान, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे आठ दिवसात मिळणार आहेत. या संदर्भात कॅबिनेटमध्ये अध्यादेश काढण्याचा विषय होता. तीस लाख शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. पाच ते आठ दिवसात पैसे मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भुजबळांनी दिली.

भीमा कोरेगाव तपासावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांचा गैरवापर झाला असून यापेक्षा वाईट कामकाज पोलिसांचं चालतं. माझ्यावर तर अनेक खोट्यानाट्या केसेस टाकल्या. पोलिसांची भूमिका भयानक होती. काही लोक चांगलं काम करतात, मात्र काही जण वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी, प्रमोशनसाठी हे काम करतात. राजकारण्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न असेल. मात्र सत्य दडवण्यासाठी केंद्र शासनाच्या यंत्रणेचा वापर होऊ नये, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

‘आम्ही सत्तेत असताना भाजपने टोलमाफीसाठी प्रचार केला, मात्र टोल तर माफ झाला नाहीच, पण ज्या टोलवर आरोप झाले ते आजही चालूच आहे. आजही रस्त्यांची दुरवस्था असून तत्कालीन राज्य सरकारने एकही चारपदरी रस्ता केला नाही. मात्र रस्ते नॅशनल हायवेला देऊन त्यांनी टोल सुरु केला. परदेशातही टोल असून फास्टटॅग लागू करुन सुधारणा करायला पाहिजे’ असं म्हणत भुजबळांनी एकप्रकारे टोलला समर्थनच दिलं.

मार्च महिन्यापासून रोज एक लाख शिवभोजन थाळी दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. शिवभोजन थाळीचा दर्जा उत्तम आहे. १८ हजारांवरुन ही योजना दुप्पट केली आहे, तर मार्च महिन्यात रोज एक लाख शिवभोजन थाळी देणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.