२४ तारखेला भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार?

Sudhir Mungantiwar

मुंबई: परमबीर सिंह(Parambeer Singh) यांच्या लेटरबॉम्बनंतरही ठाकरे सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने आता भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) याना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ तारखेला भाजपचे सर्व नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे. यावेळी पोलीस दलातील नाराज अधिकाऱ्यांनीही न घाबरता आपल्या तक्रारी राज्यपालांकडे द्याव्यात, अशी साद भाजपने (BJP) घातली आहे.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांच्या बोलण्याचा एकूण रोख पाहता भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सुधीर मुनंगटीवार यांनी आपण राष्ट्रपती राजवटीची कोणतीही मागणी केलेली नाही, हे स्पष्ट केले आहे. आम्ही केवळ राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. राज्यपालांनी या घटनेची दखल घ्यावी. राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात किंवा कृती करण्यास असमर्थ असेल तर राज्यपालांनी राष्ट्रपतींसमोर सत्य मांडले पाहिजे. परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्रासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला पाहिजे, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

या पत्रकारपरिषदेत सुधीर मुनगंटीवर यांनी पोलीस दलातील नाराज अधिकाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. सरकारमधील मंत्री तुम्हाला चुकीची कामं करायला सांगत असतील तर त्या अधिकाऱ्याने कोणाच्याही दबावाखाली न येता राज्यपालांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अनेक अधिकारी असे असतील जे सरकारच्या भीतीपोटी माहिती देण्यास मागेपुढे पाहत असतील. मात्र, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER