भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Girish Mahajan

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांच्या खंडणी उकळल्याप्रकरणी माजी मंत्री व भाजपाचे (BJP) नेते गिरीश महाजनांसह (Girish Mahajan) २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील निभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती. ही घटना जानेवारी २०१८ मध्ये कोथरुडमधील हॉटेल किमया येथे घडल्याने तेथून हा गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, निलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित यासंस्थेतील गैरकारभारामुळे शासनाने २०१२मध्ये त्यावर प्रशासक नेमले होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांना निलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे, असे सांगितले विजय पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर निलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल लावला. महाजन यांनी तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हात पाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकून लावून त्यांचे कपडे काढून डांबून ठेवले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर एमपीडीएच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरुपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुर्‍हाडीसह प्रवेश करुन तोडफोड करुन संस्थेच्या कर्मचार्‍याच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून घेऊन गेले. आरोपींनी फिर्यादी व इरातंना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER