
पुणे : राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona) डोके वर काढले आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणयाचे आवाहन केले आहे . मात्र कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले .
पुण्यात रविवारी झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळाले .
धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क नव्हते घातले. परंतु केवळ मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावली जाणार असून महाडिक किंवा अन्य कोणावर कारवाईचा अद्याप उल्लेख नाही.
धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार 22 फेब्रुवारी) लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे निर्बध होते .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला