ठाकरे सरकारला घेरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत ‘ही’ अस्त्र

मुंबई : वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा झाला असला तरीही 1 मार्चपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Budget session) भारतीय जनता (BJP) पक्षाने ठाकरे सरकारला (Thackeray Govt) घेरण्यासाठी कंबर कसली आहे.

ही बातमी पण वाचा:- आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, सरकारची कोंडी होण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता . आता राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी सरकार समोर कोणताही पर्याय नव्हता म्हणून हा राजीनामा झाला अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच पूजा चव्हाण प्रकरणात तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजप या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे, असे देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे . यापार्श्वभूमीवर सरकार चर्चेपासून दूर पळत आहे, असा आरोप फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवणं हेच राज्य सरकारचे एकमेव धोरण असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

या राज्यात महिला सुरक्षित नाहीत असा देखील आरोप फडणवीस यांनी केलेला आहे. त्यासोबतच सावरकरांविषयी कोणतंही बलिदान देण्याची तयारी बाळासाहेबांची असायची पण त्यांचे सुपुत्र मात्र त्यांना आदरांजली वाहत नाहीत, ही सत्तेची लाचारी आहे अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केलेली आहे.

या सोबतच कोव्हिडच्या दरम्यान मोठा आणि संतापजनक भ्रष्टाचार झाला असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना बोंड अळीचा होणारा त्रास असेल, सोयाबीनचं नुकसान असेल या कोणत्याही विषयांमध्ये राज्य सरकारने मदत केली नाही, शेतमालाची खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्यासोबतच राज्यात सर्वसामान्य आणि शेतकरी यांच्यासमोरही वीज बिलांचं मोठे संकट आहे. या सगळ्या विषयांवर राज्य सरकारकडे कोणतीही उत्तर नाही आणि म्हणूनच राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER