सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे…; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Ashish Shelar-CM Uddhav Thackeray

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’अंतर्गत वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. गेल्या सहा महिन्यांत करोनाकाळात एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने २५ भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली .यावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , २ लाख ५० हजार नवे रोजगार आणि ६१ हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा… आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले? निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार?, अशाप्रकारे आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER