भाजपचे वाराणसीत घरोघरी संपर्क अभियान!

BJP-PM Modi

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. येत्या १९ मे रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आता भाजपचे नेते मतदारसंघातील घरोघरी जाऊन मोदींसाठी मत मागणार आहेत. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. जनतेने जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी भाजपने हे अभियान सुरू केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील जवळपास १० हजारांहून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाराणसीत दाखल झाले आहेत.

आमचे कार्यकर्ते व्होटर्स स्लिपसह वाराणसीतील प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांना मतदान करायला सांगतील. वास्तविक पाहता येथील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून देतील याची खात्री आहे. मात्र मोदी मोठ्या मताधिक्याने निवडून यावे यासाठी आम्ही हे अभियान राबवत असल्याची माहिती स्थानिक भाजपच्या नेत्याने दिली. या मोहिमेची सुरुवात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांना १० घरांना भेट देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयात त्यांना भेट दिलेल्या घरांची माहिती देणे आवश्यक आहे.