नांदेडमधे इतर पक्षातील नगरसेवकांना फोडण्यात भाजपला यश : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार

नांदेड : काही महिन्यानंतर येऊन ठेपलेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील नगरसेवकांना फोडण्यात भाजपला मोठं यश प्राप्त झालं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह युवासेना जिल्हाध्यक्षांनीही आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठविला आहे.

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये एकूण ८१ वॉर्ड असून, येणाऱ्या काही दिवसात नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या फोडाफोडीच्या राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एकंदरीतच नांदेडमध्ये राजकीय भूकंप आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

 

शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, ते शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याही आधी म्हणजे आठवडाभराआधीच प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सदिच्छा भेट घेतली होती. या सर्वच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राजीनामे देऊन, भाजपप्रवेश करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे एकंदरीतच चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवला आहे. तर तिकडे नांदेड युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे.

काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

शिवसेना – विनय गुर्रम, दीपक रावत, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख

राष्ट्रवादी – संदीप चिखलिकर, श्रद्धा चव्हाण

काँग्रेस – नवल पोकर्णा, स्नेहा पांढरे, दजितसिंग गिल, सौ. ठाकूर, किशोर यादव