आजची परिस्थिती उद्भवण्यामागे भाजपच जबाबदार आहे – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई :  आघाडीच्या दिल्लीतील मॅरेथॉन बैठकीनंतर आज मुंबईतही आघाडीच्या बैठका होत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कोण सत्तेत असेल याविषयीचे गूढ कायम होते. त्याला आता स्वल्पविराम मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सेना आमदारांची बैठक बोलावली होती.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना बैठकीत दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन आपण पूर्ण करणार आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं – अबू आझमी

थोड्याच वेळात निर्णय येणार असून शिवसेना आमदारांनी मुंबईतच थांबावं, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यावेळी आमदारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. आज जी परिस्थिती ओढवली आहे, ती उद्भवण्यामागे भाजपच जबाबदार आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे आमदारांमध्ये जो राजकीय संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी थेट संवाद साधला.