‘भाजप व्यक्तीनिर्भर नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष’,महाजनांचा खडसेंना टोला

Eknath Khadse - Girish Mahajan

जळगाव :- एकनाथ खडसेच (Eknath Khadse) काय तर मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा आहे. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.

भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला.

पुढे म्हणाले, पक्षाच्या मागे कोण आहे, हे मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे येत्या कालखंडात ते दिसेलच. हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी लोकं येतील आणि जातील. पण दिवसेंदिवस पक्ष वाढतच चालला आहे. हे आपल्यालाही दिसत आहे. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील ८० टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

आज लोकसभा तसेच राज्यसभा मिळून ५०० पेक्षा अधिक खासदार भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतभर भाजपाची घोडदौड वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणते? याला फार काही महत्त्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

तसेच, मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटलं नाही. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

राज्यातील जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोर्टात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही. हे सरकार दिल्लीलाही जात नाही आणि कमिटीही तयार करत नाही, असे म्हणत सरकार आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : माझ्या जाण्याने काय फरक पडतो हे भाजपला लवकरच कळेल: एकनाथ खडसे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER