भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : ऊसात हत्ती शिरल्याप्रमाणे भाजप शेतात शिरत आहे. ते आपल्या पिकावर उठले आहेत. कामगार आणि कृषी कायदे फायद्याचे आहेत तर जाहीराती करुन ते का सांगावे लागत आहेत? इचलकरंजीमध्ये ज्याप्रमाणे सूत खरेदी करुन एखादा व्यापारी दिवाळखोरी जाहीर करुन आर्थिक लुबाडणूक करतो. तसेच कॉन्ट्रॅक्ट शेतीमुळे शेतकरी लुबाडला जाईल, अशी भिती गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केली. काँग्रेसतर्फे आयोजित ट्रॅक्टर रॅली आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ना. सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात पिकणारी भाजी बाजार समितीमध्ये नाही तर बुट्टी घेवून गुजरातमध्ये जावून शेतकऱ्याने विकायची काय? उद्योगपतींच्या घशात शेती घालण्याचा डाव आखला जात आहे. आता गप्प बसला तर पुढची पिढी माफ करणार नाही. संघर्ष करा. नाहीतर भविष्य अंध:कारमय होईल.

ना. विश्वजित कदम यांनी शेती आणि शेतकरी उध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे. हमीभाव न देणारा कायदा हाणून पाडा. आता ठिणगी पडली आहे. वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असे इशारा दिला. काँग्रेसने निर्माण केलेले मोठे २३ उद्योग काहींच्या घशात घातल्यानंतर आता शेतकरी मोडून काढण्यासाठीच कायदे केले आहेत. कामगार, कष्टकरी, शेतकरी विरोधात सातत्याने निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारला घालविण्यासाठी ऐकीची वज्रमुठ बांधा, असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांनी केले.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आ.राजूबाबा आवळे, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, सोनल पटेल, डी. एम. संदीपकुमार, बामसी रेड्डी, माजी आमदार बजरंग जाधव, प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, आदीसह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक इचलकरंजीचे नगरसेवक शशांक बावसकर यांनी केले. आभार माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER