हरियाणात सरकार स्थापण्यासाठी भाजपला निमंत्रण : मुख्यमंत्री खट्टर

bjp

चंदिगड:  हरियाणात पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी भारतीय जनता पार्टीला निमंत्रित केले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. दुष्यंत चौटालांच्या जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने भाजप हरियाणात सरकार स्थापन करणार आहे. रविवारी शपथविधीचा सोहळा होणार आहे. हरियाणाच्या राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित केले असल्याचे खट्टर म्हणाले.

रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास शपथविधीचा कार्यक्रम होईल. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असे खट्टर यांनी सांगितले. भाजपचे ४०, जेजेपीचे १० आणि ७ अपक्ष असे एकूण ५७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणार असल्याचे ते म्हणाले.

मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आपला राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यापालांनी खट्टर यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम संभाळण्यास सांगितले आहे.