भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजनांची माहिती

Girish Mahajan

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेत पन्नास टक्के वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे. मात्र भाजपाला ते मान्य नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात मतभेद सुरु आहे . यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. ही माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

काहीही झाले तरी सरकार भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचेच स्थापन होईल याचा पुनरुच्चारही महाजन यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

आज भारतीय जनता पक्षाची बैठक होत असून या बैठकीच भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीतील हायकमांड पुढील रणनीती ठरवतील असे महाजन म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान आपण असं कोणतंही आश्वासन शिवसेनेला दिलं नसून पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.