भाजपाचे सेवाकार्य आता पोहोचले 35 लाख लोकांपर्यंत

देवेंद्र फडणवीस यांचा दररोज कार्यकर्त्यांशी संवाद

Devendra Fadnavis

मुंबई: महाराष्ट्र भाजपातर्फे सुरू असलेले सेवाकार्य आता सुमारे 35 लाख नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतरही नेते रोज विविध भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवित आहेत.

सध्या लॉकडाऊन असल्याने व्हीडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातूनच भाजपाच्या सर्व बैठकी होत आहेत. त्यानंतर प्रमुख नेते हे दिवसभर भाजपा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. साधारणत: प्रदेश स्तरावरील सारेच प्रमुख नेत्यांची रोज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होते. त्यात आदल्या दिवशीचा आढावा घेण्यात येतो आणि दुसर्‍या दिवशीचे नियोजन केले जाते. कुठे काय कमतरता आहे, कार्यकर्त्यांना कुठे मदतीची गरज आहे, याचे नियोजन केले जाते.

त्यानंतर विविध स्तरांतील कार्यकर्त्यांशी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, सुजितसिंग ठाकूर आणि इतरही नेते यात सहभागी होतात आणि त्या-त्या विभागात सुद्धा ऑडिओ ब्रीजचे आयोजन करून आणखी तपशीलात माहिती घेतली जाते.

भाजपाच्या सेवाकार्याने आता गती घेतली असून, आतापर्यंत 35 लाख नागरिकांना शिजवलेले अन्न किंवा धान्य वितरण करण्यात येत आहे. 2 लाख नागरिकांना त्यांच्या सोसायटीपर्यंत किराणा, भाजी इत्यादी पोहोचविण्यात आली आहे.

5000 युनिटस रक्तदान करण्यात आले आहे. जिल्हानिहाय 22,000 रक्तदात्यांची यादी कुठल्याही आपातकालिन स्थितीसाठी तयार ठेवण्यात आली आहे. सॅनिटायझेशनचे काम आता 5000 गावांपर्यंत पोहोचले आहे. 12,000 ज्येष्ठ नागरिकांना औषधी व जीवनावश्यक वस्तु प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. 5 लाख नागरिकांना मास्क वितरित करण्यात आले. 4.5 लाख नागरिकांना सॅनेटायझर्सचे वितरण करण्यात आले. महिला बचतगटांच्या माध्यमातून 25 लाख मास्क तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.