आटपाडीत आनंदोत्सव ; फटकेबाजी

gopichand padalkar

सांगली : विधानपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने पडळकरांच्या समर्थकांचा उत्साह वाढला आहे. पडळकरांचे होमपीच असलेल्या आटपाडी तालुक्यात फटाके वाजवून भाजपच्या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त करण्यात आला. सुरुवात रासपनंतर व्हाया भाजप लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे गेलेल्या पडळकरांची विधानसभेला भाजपमध्ये घरवापसी झाली. आता त्यांना भाजपने विधानपरिषदेची उमेद्वारी देवू केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पडळकरांच्या पथ्थ्यावर पडल्याचे दिसत आहे.

मुंबई येथे चर्चगेट येथील पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुत्तळ्याला अभिवादन करुन शुक्रवारी विधान भवनात जाऊन गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस ,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , माजी मंत्री विनोद तावडे , विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार मंगल प्रसाद लोंडा , आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित होते. भाजपने चार नावांची शिफारस केंद्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडे केली होती. महाराष्ट्राच्या विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , अजित गोपछडे, प्रवीण दटके आदींचा समावेश आहे.

सतत चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याची माहिती मिळताच आटपाडी तालुक्याला गोपीचंद यांच्या रूपाने 25 वर्षानंतर आमदार मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द भाजपने पाळला असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि धनगर समाजातील पडळकर प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 14 वर्ष संघर्ष करताना प्रस्थापितांच्या विरोधात लढा देताना पडळकर यांनी जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढल्या आहेत. अनेक वेळा पराभूत होऊन देखील त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला होता. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात लढवल्या मुळे त्यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार दिली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पडळकर यांनी समाजाच्या प्रश्‍नासाठी सातत्याने आवाज उठवला. राज्यभर सभा घेतल्या. टेंभूच्या पाण्यासाठी संघर्ष केला. वेळप्रसंगी तुरुंगात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना आडवले. सतरा वर्ष सातत्याने राजकीय संघर्ष केला. राजकारणाची सुरुवात त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली केली. करगणी जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली. खानापूर विधान सभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली. पराभव झाला पण थांबले नाहीत. त्यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवला. लोकसभेला सांगली मतदार संघातील मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेद्वारीवर विद्यमान खासदार आणि भाजपचे तगडे उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले. वातावरण तापवले. त्यानंतर भाजपच्या हाकेला पुन्हा प्रतिसाद देत पक्षाच्या आदेशाने विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे तगडे नेतृत्व अजित पवार यांच्या विरोधात निवडणुक लढविली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आटपाडी तालुक्यात पडळकर यांच्यामुळेच भाजपची सता आली होती. आटपाडी तालुक्यात थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांना काँग्रेसने विधान परिषदेवर संधी देवून आमदार केले होते . खानापुर- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे नेते माजी आमदार अण्णासाहेब लेंगरे नेतृत्व केले होते . 1995 मध्ये अपक्ष म्हणून राजेंद्रअण्णा देशमुख आमदार झाले होते. त्यानंतर आता पंचवीस वर्षांनंतर गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने आटपाडी तालुक्याचा आमदार मिळणार आहे.