…तर मी स्वत: शरद पवारांच्या घराबाहेर ढोल वाजवणार – गोपीचंद पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar - Sharad Pawar

मुंबई : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) आता धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे . यापार्श्वभूमीवर धनगर समाजानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे . धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात भाजपा (BJP) आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वाखाली ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले . पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आता तुम्ही जागे व्हा. आज धनगर समाज शांततेने आंदोलन करत आहे. जर त्यांच्या भावनांचा विचार केला गेला नाही, काही निर्णय झाला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करु. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर मी स्वत: जाऊन ढोल वाजवणार, असा इशारा पडळकर यांनी दिला .

सत्ताधारी आमदारांच्या घराबाहेर जाऊन धनगराचा मुलगा ढोल वाजवेल आणि झोपेचं सोंग घेतलेल्या नेत्यांना जागं करु . हे आंदोलन कोणाच्याही नेतृत्त्वात चालू नाही. मी धनगर समाजाचा कार्यकर्ता असून जबाबदारी म्हणून आंदोलन घोषित केलं आहे. कोणत्याही पत्रकावर माझं नाव, फोटो नाही. माझा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. धनगर समाजाच्या हितासाठी सर्व काही करु, असेही पडळकर म्हणाले .

दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आज गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन’ होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून धनगर समाजाचे बांधव ढोल वाजवत आंदोलन स्थळाकडे येऊ लागले आहेत. भंडाऱ्याची उधळण करत आणि धनगरी नृत्य करत सर्व धनगर बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER