भाजपच्या 50 रणरागिणी शिवसेनेत; संजय राऊत म्हणाले, नाशकात पुढचा महापौर शिवसेनेचा

Sanjay Raut

नाशिक : आगामी नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराने जोर धरला आहे. त्यातच आज भाजपला शिवसेनेने जबरदस्त धक्का देत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवबंधनात अडकवले. भाजपच्या तब्बल 50 महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी बघता मला सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटतं आहे. काल राष्ट्रवादीचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली. महापालिकेविषयी चर्चा झाली, ती इथे कशी सांगणार, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर, आमचं ठरलंय, असा निर्धारही राऊतांनी व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे राजकीय दबावाखाली येऊन काम करत आहेत. राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. राजकीय दबावामुळे 12 आमदारांचा वेळ वाया गेला त्याच काय? विमान प्रवासाला परवानगी नाकारण्यात आलेल्या प्रकरणामुळे या युद्धाला सुरुवात झाली असून अशा अनेक घटना युद्धात होतात. राज्यपाल आणि सरकारचं शीत युद्ध नाही तर खुलं युद्ध आहे, असंही राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग वापरल्यानंतर त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करताहेत तीच आंदोलने त्यांना त्यावेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत असते. या देशात हुकूमशाही वा लष्करशाही नाही. ज्या देशात हुकूमशाही वा लष्करशाही आहे तिथेही लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.

शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशात आंदोलन व्हावी असं जर वाटत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. भाजपला आज आंदोलनाचा तिरस्कार वाटतोय, पण त्याच आंदोलनातून भाजपचा जन्म झालाय. उद्याही त्यांची सत्ता गेल्यानंतर याच प्रकारची आंदोलने भाजपला करावी लागतील.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने नाशिकमध्येमोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER