वाझेचे मालक बिंग फुटण्याच्या भीतीने चिंतेत, फडणवीसांचा आघाडीच्या मंत्र्यांना टोला

नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलीस विभागातील बदली संदर्भातील रॅकेटचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो अहवाल आणि काही संभाषणाच्या ऑडिओ क्लिप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हाती लागले होते. फडणवीस यांनी हे सगळे पुरावे आता केंद्रीय गृह सचिवांकडे सुपूर्द केले आहे. मात्र फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले असल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. आता त्यावर फडणवीसांनी मलिक यांच्यावर पलटवार केला.

नवाब मलिक का चिंतेत आहेत हे मला माहिती आहे. फोन टॅपिंगचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे दिलेला आहे. त्यामुळे आता अनेकांचं बिंग फुटणार आहे. हा रिपोर्ट खरं पाहायचं झालं तर नवाब मलिक यांनीच फोडाला आहे. सिंडिकेट राज्य चालवल्याने, बदल्यांसाठी दलाली घेतल्यामुळे आणि सचिन वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज्य चालवल्याने महाराष्ट्र सरकार बदनाम झाले की त्यांचे नाव झाले हा प्रश्न आहे. हे सगळे वाझेंचे मालक चिंतेत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते सचिन सावंतयांनी केलेल्या आरोपांवरही उत्तर दिले. सचिन सावंत काहीही बोलतात. त्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची मला गरज नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमच्याकडे रॅम कदम सारखे अनेक नेते आहेत, असे म्हणत त्यांनी सावंत यांच्या प्रश्नाची हवाच काढली.

पोलिसांचे जे सीसीटीव्ही आहेत. त्यांचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्व्हरला आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचे फुटेज गायब होऊ शकत नाहीत. खासगी डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहेत. मात्र, मुंबई पोलिसांचे सीसीटीव्ही आणि फुटप्रिंट अशा प्रकारे स्टोअर केले जाते, जो एक माणूस नष्ट करु शकत नाही. सध्या एनआयएकडून मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी धमकी प्रकरणाचा तपास सुरु आहे. वाझेंचे मालक हेच आहेत. या चौकशीतून काय बाहेर येईल हे माहीत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. एनआयए चौकशी करत आहे. लवकरच सगळ्या गोष्टी बाहेर येतील.

नागपुरात कोरोनाची स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, नागपुरात कोरोनाची अत्यंत गंभीर झाली आहे. लोकांना बेड्स उपलब्ध होत नाही. प्रशासनाला पूर्ण सक्रिय मोडमध्ये न्यावे लागेल. लोकांना आता मदत करावी लागेल. लोकांना आता धीर देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले

राज्यात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय. तसेच, चाचण्या वाढवणे हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली, असा टोलाही लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER