गुजरात स्थानिक निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

BJP Flags

गांधीनगर: गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या सहा  महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले होते. आता स्थानिक जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्येही भाजपने जोरदार यश मिळवले आहे. राज्यात काँग्रेससह विरोधकांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला. या  मोठ्या अपयशानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा परिषद आणि २३१ तालुका पंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी हाती आले.

या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखली आहे. भाजपने सर्व ३१ जिल्हा परिषदांसह २३१ तालुका पंचायतींपैकी १९६ पंचायती आणि ८१ नगरपालिकांमधील ७४ नगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे. राज्यात काँग्रेसला केवळ एक नगरपालिका आणि १८ तालुका पंचायतींमध्येच विजय मिळवता आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम मानली जात होती. ज्यामध्ये भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएम आणि ‘आप’नं केवळ हजेरी लावण्याचं काम केलं आहे.

या निकालानंतर काँग्रेसमधून राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी राजीनामा दिला आहे. पराभवानंतर चावडा यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतले आहेत. दरम्यान, मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. या निकालावरून स्पष्ट होत आहे की, गुजरातमध्ये भाजपचा विकास आणि सुशासनाचा अजेंडा मजबुतीनं काम करत आहे. भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मी गुजरातच्या लोकांना नमन करतो, असं मोदींनी म्हटलं आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील जनतेचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल गुजरातच्या जनतेला धन्यवाद देतो. हे स्थानिक पंचायत निवडणुकांचे निकाल विकास आणि विश्वासाचे प्रतीक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER