भाजपकडून त्या नगरसेवकांना अपात्रतेची नोटिसा

BJP Logo

सांगली : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतील फुटीर 6 नगरसेवकांना सोमवारी भाजपने (BJP) सदस्य अपात्रतेबाबत कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या. सात दिवसांत खुलासा मागविला आहे. सहयोगी सदस्य विजय घाडगे यांच्याबाबत वकिलांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे (Deepak Shinde) यांनी दिली.

महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या 4 आणि भाजप सहयोगी 1 अशा एकूण 5 नगरसेवकांनी व्हीप डावलून ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. यामध्ये महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसिमा नाईक आणि विजय घाडगे यांचा समावेश आहे. भाजपचे आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे 2 नगरसेवक मतदानासाठी अनुपस्थित होते. त्यांनाही भाजपने व्हीप बजावला होता. दरम्यान या 7 नगरसेवकांमुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला. भाजपने त्याची गंभीर दखल घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुटीर नगरसेवकांवर कडक कारवाई होईल, असे म्हटले होते.

दीपक शिंदे आणि महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते विनायक सिंहासने यांच्या स्वाक्षरीने भाजपच्या फुटीर 6 नगरसेवकांना नोटिसा दिल्या आहेत. रजिस्टर्ड पोस्ट, ई-मेल, व्हॉटस्अॅपद्वारे या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. भाजपचे सहयोगी नगरसेवक घाडगे यांना सोमवारी नोटीस देण्यात आली नाही. वकिलांशी चर्चा करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती दीपक शिंदे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER