‘शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, सुप्रिया वांगी लाव’ ; राष्ट्रवादीला भाजपचे प्रत्युत्तर

NCP-BJP

मुंबई : ‘राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण ‘असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर आपल्या व्यंगचित्राद्वारे टीकास्त्र सोडले. ‘शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट, सुप्रिया वांगी लाव’ , अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत बालभारतीच्या संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीनुसार सभागृहात संख्यावाचनाचे धडे दिले होते . इतकेच नाही तर राष्ट्रवादीने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट करत त्याला ‘ जोड्या लावा ‘ असे कॅप्शन दिले. राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता . हाच धागा पकडत भाजपनेही राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे . 15 वर्ष महाराष्ट्र कसा लुटला? असा कॅप्शन असलेला फोटो भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी शेअर केला आहे.