स्थायी समितीवरून बीएमसीत शिवसेना विरुद्ध भाजप नवा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे

BMC - BJP

मुंबई : पुढील आठवड्या मुंबई महापालिका (BMC) स्थायी समितीची बैठक आहे. या बैठकीत 500 हून अधिक प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आले असून, एका बैठकीत 50 ते 60 पेक्षा जास्त प्रस्ताव ठेवू नयेत, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे.

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीची बैठक गेल्या सहा महिन्यांपासून घेण्यात न आल्याने विविध कामांचे तब्बल 500हून अधिक प्रस्ताव रखडले आहेत. पालिकेच्या चिटणीस विभागाला हे 500 प्रस्ताव एकदम सादर करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे.

इतक्या प्रस्तावांचा अभ्यास कधी करणार, असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. तर, प्राधान्यक्रम वगळून मलईदार प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याचा घाट सत्ताधारी शिवसेनेने पालिका चिटणीस विभागाला हाताशी धरून घातल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता पालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा नवा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार स्थायी समितीची बैठक एप्रिलपासून झालेली नाही. गेले सहा महिने बैठक होऊ न शकल्याने विविध खात्यांच्या कामांचे सुमारे 500 हून अधिक प्रस्ताव पालिका चिटणीस विभागाला सादर झाले आहेत. हे सर्व प्रस्ताव स्थायी समितीच्या एकाच बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर समाविष्ट करण्याचा घाट चिटणीस विभागाला हाताशी धरून सत्ताधारी शिवसेनेकडून (Shiv Sena) घालण्यात येत आहे. असा आरोप भाजपचे गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

स्थायी समितीची बैठक आठवड्यातून दोन अथवा तीन वेळा आयोजित करावी आणि प्रत्येक बैठकीत ५० ते ६० प्रस्ताव सादर करावे, अशी मागणी त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाने मोठय़ा प्रमाणावर कोरोनाविषयक साधनसामग्रीची खरेदी केली आहे. मनमानीपणे केलेल्या या खरेदीची माहिती मिळावी यासाठी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, त्याची उत्तरेच प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीत. आता या खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाने कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER