“भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेत…”; टिकैत यांचा भाजपवर निशाणा!

BJP - Tikait

दिल्ली : गेल्या १०० दिवसांहून अधिक कालावधीपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि MSP वर कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकारमध्ये अनेक चर्चा झाल्या. परंतु यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैट आंदोलन मोठे करण्यासाठी विविध राज्यात महापंचायतींचे आयोजन करीत आहेत. राकेश टिकैत यांनी पश्चिम बंगालचा दौऱ्यात भाजप सोडून अन्य कोणत्याही पर्यायांना मत देण्याचे आवाहन केले. भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे, आपले पुढील ध्येय संसदेत मंडई सुरू करणे असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

“ज्या दिवशी संयुक्त मोर्चा निर्णय घेईल. त्या दिवशी संसदेच्या बाहेर नवी मंडई उघडली जाईल. दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर शिरणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आमच्याकडे ३.५ लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत. आमचे पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री करण्याचे आहे.” असे टिकैत म्हणाले.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी राकेश टिकैत यांचे विमानतळावर स्वागत केले. टिकैत यांनी शहरात आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राम येथे सामाजिक कार्यकर्त्या मधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना संबोधित केले. “भाजप सरकार शेतकरी आणि शेतकरी आंदोलनाचा कणा तोडण्याचे प्रयत्न करत आहे. हे जनतेच्या विरोधातले सरकार आहे. भाजपला मत देऊ नका. जर त्यांना मत दिले तर ते तुमची जमीन मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना देऊन टाकतील. ते तुमची उपजीविका धोक्यात टाकतील.” असेही टिकैत यावेळी म्हणाले.

भाजप फसवणूक करणारा पक्ष

“भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे. आम्ही भाजपचा विरोध करणाऱ्यांसोबत, शेतकरी आणि गरीबांसोबत उभे आहोत. पश्चिम बंगालमध्ये शेतकरी महापंचायत आयोजित करण्याचा अर्थ कोणत्याही पक्षाला समर्थन देणे नाही. या ठिकाणी कोणत्याही विशेष पक्षासाठी मते मागण्यासाठी आलो नाही.” असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER