मुख्यमंत्र्यांच्या दुष्यंतला रोखण्यासाठी भाजपचे धक्कातंत्र

Dusyant Chaturvedi-Fadnavis

badgeबीड आणि यवतमाळ अशा विधान परिषदेच्या दोन रिकाम्या जागांची निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते मुंडे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने ह्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवारांनी आपापले अर्ज भरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. सहा महिन्यांच्या  आत त्यांना निवडून येणे आवश्यक आहे. यवतमाळमधून उभे राहून उद्धव भाजपला धक्का देतील अशी चर्चा होती. विदर्भ हा सध्या भाजपचा गड आहे. भाजपच्या गडात उभे राहून देवेंद्र फडणवीस यांना ललकारण्याची मोठी संधी उद्धव यांनी वाया घालवली. विदर्भात शिवसेनेची ताकद नाही. उद्धव इकडून निवडून गेले असते तर शिवसेनेला विदर्भात बळ मिळाले असते. पण उद्धव ‘सेफ’ खेळत आहेत असे दिसते. मराठवाड्यातील बीडमध्ये जाण्याचा धोकाही त्यांनी टाळला आहे. मुंबई किंवा कोकणातून एखाद्या सुरक्षित मतदारसंघातून ते उभे राहतील असा रागरंग दिसतो.

बाहेरचे उमेदवार खपवण्याची हमखास जागा अशी यवतमाळची कीर्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीत उस्मानाबादचे तानाजी सावंत यांना युतीमध्ये शिवसेनेने इकडे आणले होते. निवडून आल्यावर तानाजी यवतमाळला फिरकलेच नाहीत. शिवसेनेने यावेळी नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाणाऱ्यांची गर्दी सुरू असताना दुष्यंत यांनी शिवसेनेत उडी घेतली. काँग्रेसने निलंबित केलेले त्यांचे वडील ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसने याच सुमाराला पक्षात परत घेतले. वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा शिवसेनेत असे आज चित्र आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा  घेतल्याने दुष्यंत यांची उमेदवारी भक्कम झाली आहे. भाजपने सुमित बाजोरिया यांना उभे करून लढतीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे हे बंधू. शिवसेनेच्या वाघाला रोखण्यासाठी भाजपला उमेदवार उसनवार घ्यावा लागला, हे वास्तव बराचसा निकाल सांगून जाते. दोन्ही उमेदवार शक्तिशाली आहेत. त्यामुळे आखाडा रंगणार.