कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटीचा घोटाळा : भाजपचा आरोप

Kolhapur BJP

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या ८८ कोटींच्या साहित्य खरेदीमध्ये तब्बल ३५ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी केला. जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत कोरोना साहित्य खरेदीतून संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत:बरोबरच नेत्यांच्या पुरवठादार नातेवाईकांची `सोय’ केली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य आणि केंद्रसरकारने या घोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करून दोषींकडून अपहाराची रक्कम वसूल करावी. अन्यथा याविरोधात जनहित याचिका दाखल करून न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवला जाईल, असा इशाराही नाईक-निंबाळकर यांनी दिला.

नाईक -निंबाळकर म्हणाले, कोरोना साहित्य खरेदी ही पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने केली आहे. आपत्कालीन स्थितीत खरेदी मर्यादा ही एक कोटी रूपयांची असताना या बाबीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करून विभागीय आयुक्त अथवा प्रधान सचिवांच्या परवानगीशिवाय ८८ कोटींची खरेदी केली आहे. खरेदी प्रक्रिया ही जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीस अधीन राहून केली नसून ई-टेंडर प्रक्रिया राबवालेली नाही. ज्या पुरवठादारांनी साहित्य पुरवले आहे, ते जीएसटी कायद्यांतर्गत रजिस्टर्ड नाहीत. काही पुरवठादारांचे रजिस्ट्रेशन तारीख व त्यांच्याकडून केलेल्या साहित्य खरेदीची तारीख ही एकाच दिवसाची आहे. तसेच रजिस्ट्रेशन झालेल्या दिवशीच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.

केवळ साहित्य खरेदीसाठी काही कंपन्या ऐनवेळी सुरु केल्या असून टेक्सटाईल कंपनीकडून थे स्कॅनरचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे २२४ रूपये किमताच ऍन्टिजेन टेस्ट कीट कसबा बावड्यातील एका कोविड केअर सेंटरला देण्यात आले होते. त्याची सुमारे १२०० रूपयांना बाहेर विक्री करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER