कडू रस – जिभेला अप्रिय पण शरीराला उपयोगी !

कडू रस - जिभेला अप्रिय पण शरीराला उपयोगी !

कडू रस असलेले पदार्थ तसे कमीच खाण्यात येतात. तसे पाहता हा रस आहारात नकोसा असणाराच. कडू रस म्हटले की एकदम कारलेच आपल्या डोळ्यासमोर येते. साखरेत घोळले तूपात तळले तरी कारले कडू ते कडूच असे आपण म्हणतोच. पण कारले थोडे तरी खा असे प्रत्येक आई आपल्या मुलाला आग्रह करीत असते. कारण इतर रसाप्रमाणे कारल्याचा कडू रस आपल्या शरीराला उपयोगी आहे हे आपण जाणतोच. चैत्र महिन्यात कडूलिंबाचा पाला गुढीला लावणे शिवाय त्यादिवशी गोड पदार्थासोबत कडूलिंबाची चटणी ताटात असणे हे सुद्धा कडू रसाचे महत्त्व दर्शवणाऱ्याच पद्धती आहेत. सहा रसांमधील प्रत्येक रसाचे महत्त्व आहे त्याचे फायदे व नुकसान आहेत. तसेच कडूरसाचे पण शरीराला फायदे व अति सेवनाने नुकसानही आहेत. आयुर्वेदात प्रत्येक रसाचे गुण व अति सेवनाने होणारे व्याधी सांगितले आहेत.

बघूया कडूरसाविषयी –

जो रस जिभेशी संपर्क येता क्षणी जिभेची संवेदना नष्ट करतो, जिभेला अप्रिय ठरतो तोंड कोरडे करतो पण नंतर चव आणतो त्याला कडू रस म्हणतात. अशी व्याख्या आयुर्वेद आचार्यांनी सांगितली आहे. हे आपण अनुभवतो देखील. कडू काढा चूर्ण घेतले की हे जाणवते. अनेकवेळा आयुर्वेद तज्ज्ञाला सांगितले जाते की फार कडू असतात हो आयुर्वेदीक औषधे जीभेची चवच जाते. बरोबर ना!

अरुचिकारक जरी असला तरी कोणत्याही कारणाने, व्याधीने आलेली अरुचि घालविणारा हा कडू रस आहे!

कडू रस हा उत्तम जंतनाशक आहे. पोटात जंत झाले असतील तर कडू रसाचे सेवन केल्यास कृमी नष्ट होतात. डोक्यात ऊवा लिखा होणे, फंगल इन्फेक्शन होणे यात कडूलिंब तेल लावणे, पानांचा स्नानाच्या वेळी वापर फायदेशीर ठरतो कारण कडूलिंबाचा कडू रस आणि कृमिनाशक गुण.

कडू रस दाह खरूज कुष्ठ त्वचारोग कमी करणारा आहे. उदा. कडूलिंब चंदन हे कडू रसाचे असल्यामुळे त्वचारोग दाह कमी करणारे आहेत.

कडू रस ज्वर ( ताप ) कमी करणारा, कफ कमी करणारा आहे. म्हणूनच तापेवरील किंवा कफ कमी करणारी औषधे सहसा कडू असतात. उदा. अडूळसा, गुळवेल इ.

कडूरस स्तन्याचे शोधन करणारा स्तन्यामधील कफ कमी करणारा आहे. बाळंतीणीला मेथीचे लाडू देण्यामागचे कारण हेच आहे. कारण समजले की गैरसमज दूर होतात आणि सल्ला ऐकला जातो.

कडू रस कफ मांस मेद कमी करणारा आहे. म्हणूनच वजन कमी करणाऱ्यांना कडू रस असणारे पदार्थ घ्यायला पाहिजे. कोलेस्टेरॉल मधुमेह लठ्ठपणा या विकारात कडू पदार्थ घेतल्याने फायदा होतो.

घश्यातील कफ कमी करणारा कंठ चांगला करणारा आहे. हळद पाण्यात टाकून गुळण्या केल्याने फायदा का होतो तर हळदीचा कडू रस कफनाशक गुण होय.

अनेक गुण कडू रसाचे आहेत. तसे बघितले तर आपण हा रस जास्त सेवन करीतच नाही. प्रत्येक पदार्थात हळदीचा उपयोग आपण करतोच. विविध भाज्या जेवणात आपल्या असतातच. उदा. कारले, मेथी, मेथीदाणे, जवस हे आहारात आपण वेळोवेळी विविध रुपात घेतो. आपली आहारपद्धती इतकी शास्त्रपूर्ण आहे की विशेष काही प्रयत्नपूर्वक उपाय योजना करण्याची गरज तशी पडतच नाही. इतका सखोल विचार आपल्या पूर्वजांनी येणाऱ्या पिढ्यांकरीता करून ठेवला आहे. गरज आहे त्यावर विश्वास ठेवून अवलंबन करण्याची, असो. परंतु अति सेवनाने काय होते तर वात वाढतो वातव्याधी होतात. शरीरात कृशता येते. अति वजन कमी होणे, चक्कर, सांधेदुखी, वारंवार तहान लागणे, तोंड कोरडे पडणे अशी लक्षणे उत्पन्न होतात.

असा हा कडू रस साखरेत घोळा किंवा तूपात तळा पण थोड्या प्रमाणात तरी आहारात असू द्या!

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER