सात जिल्ह्यांतील बर्ड फ्लूचे नमुने पॉझिटिव्ह

Bird Flu

पुणे : ठाणे, सातारा, बीड, लातूर, नांदेड, नागपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांतील, भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग निदान संस्थेकडे पाठविलेल्या मृत कोंबड्यांच्या नमुन्यांच्या तपासणीत बर्ड फ्लू आढळला आहे. मुंबईत विविध भागांत गेल्या २४ तासांत १८२ पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर १० जानेवारीपासून आतापर्यंत १,६६० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली. मुंबईत बर्ड फ्लूचा धोका नसला तरी गेले काही दिवस कावळे आणि कबुतरांचे मृत्यू होत आहेत. विदर्भात नागपूरसह गडचिरोलीत बर्ड फ्लूची लागण झाल्याचे भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील वारंगा येथील एका खासगी फार्म हाऊसमधील कोंबड्या दगावल्या होत्या, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गडचिरोलीत फुले वॉर्डातील एका व्यावसायिकाच्या कोंबड्याही बर्ड फ्लमुळे दगावल्याचा अहवाल भोपाळ येथील संस्थेने दिला आहे.

या व्यावसायिकाच्या प्रक्षेत्रापासून १ ते १० कि.मी. त्रिज्येतील परिसरातून कोंबड्यांची वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुकुट खत यावर बंदी घातली आहे. रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू केले आहेत. सात जिल्ह्यांतील १४ ठिकाणी बर्ड फ्लूसाठी कुक्कुट पक्षी नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून लांब कुक्कुट पक्ष्यांना शास्त्रोक्त नष्ट करण्याची प्रक्रिया केली आहे. वरील सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER