बर्ड फ्लू अत्यंत धोकादायक; हाय अ‍लर्ट जारी करण्याची आवश्यक्ता : राजेश टोपे

Rajesh Tope

जालना :- एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट असताना आता राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. यामुळे वेगाने पसरत असलेल्या बर्ड  फ्लूला  रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे उपयोजना आखल्या जाणार आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली. बर्ड  फ्लूचा  (Bird Flu) डेथ रेट हा १० ते १२ टक्के असून हा आजार अत्यंत घातक आहे. त्यामुळे राज्यात हाय अ‍लर्ट घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला.

बर्ड  फ्लूबाबत राज्यात हाय अ‍लर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्युदर १० ते १२ टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कोंबड्या आणि कावळे बर्ड  फ्लूमुळे मृत पावल्याचा अहवाल मिळाला आहे. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हाय अलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. राज्यात येत्या १६ तारखेलाच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज फ्रंटलाईनवर असणाऱ्या १० हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

तातडीची गरज म्हणून राज्याला १६ लाख लसींची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती द्यावी आणि कोणती देऊ नये हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, असं सांगतानाच कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस आपल्याला मिळणार आहे आज ना उद्या कळेल, असं त्यांनी सांगितलं. लसीकरणासाठी आठ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असली तरी राज्याला पहिल्या टप्प्यात १६ लाख लसींच्या डोसेसची आवश्यकता आहे. दररोज १० हजार कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत अलर्ट जारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER