बिमल जालान म्हणतात, रिझर्व्ह बँकेने सरकारचेच धोरण राबवावे

पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

bimal-jalan

मुंबई :- रिझर्व्ह बँक ही सरकारला जबाबदार आहे. त्यामुळे बँकेने सरकारने आखून दिलेल्या धोरणांच्या अधीन राहूनच स्वत:ची धोरणे आखावीत, असे परखड मत बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँक व सरकारमधील वाद मागील काही दिवसात चांगलाच वाढला होता. त्यामुळे बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर जालान यांनी पहिल्यांदाच केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

रिझर्व्ह बँकेकडे ९ लाख ७० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रोख आहे. त्यापैकी ३ लाख ७५ हजार कोटी रुपये बँकेने सरकारला द्यावेत, अशी मागणी केंद्राकडून होत होती. सरकारनियुक्त संचालकांनी या विषयावरुन पटेल यांना बैठकीत चांगलेच घेरले होते. त्या दबावातूनच पटेल यांनी डिसेंबर महिन्यात पदत्याग केला. यानंतर नव्याने आलेले गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरकारला किती अतिरिक्त रोख द्यावी, यासंबंधी निर्णय घेण्यासाठी जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा पदभार स्वीकारल्यानंतर जालान यांनी पहिल्यांदाच, रिझर्व्ह बँक ही केवळ सरकारच्या अधिपत्याखाली आहे, असे स्पष्ट मत मांडले आहे.