बिलोली: सावळी येथील रस्त्याच्या बोगस कामाची चौकशी करा-गावक-यांची मागणी

15 फेब्रुवारी पासून उपोषणाचा इशारा.

बिलोली :- तालुका प्रतिनिधी-तालुक्यातील मौजे सावळी येथे वस्तीसुधार योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.या बोगस कामाची क्वॉलिटी कंट्रोल विभागा मार्फत चौकशी करून यातील दोषींना निलंबित करा अन्यथा दि.15 फेब्रुवारी पासून बिलोलीच्या पंंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

वसंतराव नाईक तांडा वस्तीसुधार योजना 2018-19 अंतर्गत सावळी गावातील शंकर काळे यांचे घर ते रामचंद्र कामनासे यांच्या घरापर्यंत 6 लाख व खंडोबा वस्ती ते हुलुलकर यांचे घर ते मारोती सुरकुंटवार यांचे घरापर्यंत सी.सी रस्ता करण्यासाठी 10 लाख रूपयाचा निधी मंजूर झाला.दोन्ही रस्त्यासाठी 16 लाख रूपयाचा निधी मंजूर झालेला असतानाही गुत्तेदाराकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम होत नसून एका कामात ठरवून दिलेल्या अंतरापर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही.तर दुसर्‍या कामात शासनाच्या अंदाजपञकानुसार योग्य प्रमाणात गिट्टी,मुरूम, स्टील चा वापर करण्यात आलेले नाही.यासोबतच नाली बांधकामात नालीवर स्लँब टाकताना गजाळी स्टील चा वापर करणे गरजेचे असताना स्टील ऐवजी फरशीचा वापर होत असल्याची गावकर्‍यांकडून ओरड होत आहे.

या होत असलेल्या बोगस कामाची चौकशी करावी या मागणीसाठी नागरिकांनी वेळोवेळी अर्ज करून उपोषण व आत्मदहनाचा इशारा देऊनही या कामाची कोणतीच चौकशी न करता पंचायत समिती विस्तार अधिकारी,अभियंता,व ग्रामसेवकाच्या संगनमताने 6 लाखाचे बिल काढण्यात आल्याने संबंधितांना निलंबित करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी किशन कोप्पिरगेवार,रामचंद्र कामनासे यासह गावकर्‍यांनी एका निवेदनाद्वारे केली असून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास दि.15 फेब्रुवारी पासून बिलोली पं.स कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.