बिहार : तुतारीचा आवाजच निघाला नाही; शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मते!

Bihar Election 2020

पाटणा :- शिवसेना (Shivsena) या वेळीही बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत उतरली. मात्र २०१५ प्रमाणे या वेळीही सपाटून मार खाते आहे. आतापर्यंत तिला २३ पैकी २१ मतदारसंघांत ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. मतदारांनी तिला नाकारले आहे.

शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या शिवसेनेच्या उमेदवारांना ०.०४ टक्के मते  मिळाल्याचा अंदाज आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मते  मिळाली आहेत. शिवसेनेने ५० उमेदवार देण्याची घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्षात २३ जागांवरच निवडणूक लढवली.

राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात शिवसेना डेंजर झोनमध्ये –

पालिगंज, गया शहर, वझीरगंज, चिरैया, मानेर, फुलपरेश, राघोपूर, बेनिपूर, मधुबनी, तरैया, अस्तवा, औरिया, कल्याणपूर, बानमंखी, ठाकूरगंज, समस्तीपूर, सराई, मोरवा, किशनगंज, बहादूरगंज, नरपतगंज, मनिहारी.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला आधी ‘बिस्किट’  हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेने चिन्ह बदलून मागिलते होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे सुचवले होते; पण ही तिन्ही चिन्हं आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

नीतीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्च्याची  निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपाचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. त्यानुसार सेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले आहे.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – ८० / २४३
  • एकूण मिळालेली मते – २ लाख ११ हजार १३१
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – ०७ (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – ०२ (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – ०१ (बलरामपूर)
  • एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती.  (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – १ लाख ८५ हजार ४३७, एमआयएमला मिळालेली मतं – ८० हजार २४८ )

ही बातमी पण वाचा : बिहार विधानसभा निकाल: एनडीएने गाठला बहुमताचा आकडा आघाडीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER