तेजस्वीच्या रुपाने नवं नेतृत्व तयार व्हावे यासाठी बिहारकडे लक्ष दिले नाही – शरद पवार

Sharad Pawar - Tejashvi Yadav

पुणे :- बिहार निवडणुकीचा निकाल लागण्यास अवघे काही तास उरलेले आहेत. बिहार निवडणुकीत एनडीएची वाटचाल बहुमताच्या दिशेनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला छेद जाऊ देता कामा नये, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. तसेच बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या रूपाने नवे नेतृत्व तयार व्हावे यासाठी आम्ही बिहारच्या निवडणुकीत रस घेतला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पुण्यातील निवासस्थानी आंतरभारती या दिवाळी अंकाचे शरद पवार यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar’s Statement On Bihar Elections)

धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच भारतासारख्या देशाला एकसंध ठेवू शकते, या संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये, धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत, हिंदू- मुस्लीम, इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे, असा आरोपही शरद पवारांनी बिहारच्या सत्ताधाऱ्यांवर केला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव (Tejashvi Yadav) यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी लढत बघायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे बदलाची वाट निर्माण होत आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मोठा फटका बसला आहे, असं म्हणता येणार नाही. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीश कुमारांचंही फार काही नुकसान झालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. तेजस्वीला जेवढी मोकळीक मिळेल तेवढा फायदा होईल, असा अंदाज होता. म्हणून आम्ही बिहार निवडणुकीत सहभाग घेतला नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीत जरी बिहारमध्ये बदल झाला नसला, तरी भविष्यात तिथे बदलाची वाट मोकळी झाली आहे. त्याचबरोबर गेली १५ वर्षे नितीश कुमार सत्तेवर असले तरी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या जंगलराज या टीकेचा परिणामही बिहारच्या लोकांच्या मनावर झाल्याचं पवार यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : बिहार : तुतारीचा आवाजच निघाला नाही; शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’ पेक्षाही कमी मत ! 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER