बिहारमध्येही भडका : उत्तरप्रदेशात मृतांची संख्या १७

Bihar

पाटणा/लखनौ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्ली व उत्तरप्रदेशातील हिंसक आंदोलन थांबविण्याआधीच संपूर्ण बिहारमध्ये आंदोलन पेटले. या कायद्याविरोधात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केलेल्या बिहार बंदच्या दरम्यान निदर्शकांनी रेल्वेगाड्या रोखल्या आणि टायर्स व काही वाहने पेटवून रस्तेही अडविले. मात्र, पोलिसांनी आंदोलन नीट हाताळल्याने हिंसाचार झाला नाही. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. उत्तरप्रदेशाच्या अनेक जिल्ह्यांत आजही आंदोलनाला हिंसक वळण लागले.

राज्यात शुक्रवारी झालेल्या आंदोलनाच्या वेळी गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या आता १७ झाली आहे. आंदोलनप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ११ हजार लोकांविरुद्ध गुन्हे नोंदविले असून, एक हजाराहून अधिक लोकांना अटक केली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप तणाव असून, तेथील मोबाईल इंटरनेटसेवा बंदच आहे. संपूर्ण राज्यभर जमावबंदी आहे आणि पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल आणि शीघ्र कृती दलाचे जवान राज्यभर रस्त्यांवर दिसत आहेत.

आमदार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल